» महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ (About MSBSD) –

  • महाराष्ट्र शासनाने सन 1956 मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण परीक्षा मंडळाची स्थापना केली होती. सदर मंडळामार्फत राज्यामध्ये व्यवसाय अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत होती. दरम्यानच्या काळात तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षणाची व्याप्ती व वाढ झाल्याने दोन स्वतंत्र परीक्षा मंडळांची गरज लक्षात घेता शासनाने सन 1986 मध्ये तंत्र शिक्षण संचालनालयाचे विभाजन तंत्र शिक्षण संचालनालय व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय केले. त्याअनुषंगाने शासन निर्णय क्र. इएक्सएम-7384/38751/(535) तांशि-1 (अ), दि. 23 जानेवारी 1986 अन्वये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकासपरीक्षा मंडळाची तंत्र शिक्षण परीक्षा मंडळातून विभाजन करून निर्मिती करण्यात आली.
  • औद्योगिकीकरणातील वाढ, बदलते तंत्रज्ञान, सामाजिक व आर्थिक बदल या बाबींचा विचार करता अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी (ऍ़ड-ऑन कोर्सेस) कमी कालावधीचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करुन अशा विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना मिळणेचे दृष्टीने आवश्यक असणा-या व्यवसाय शिक्षणाची गरज भागविण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली सन 1986 मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकासपरीक्षा मंडळामार्फत रोजगार व स्वयंरोजगार या उद्दीष्टपूर्तीसाठी व्यवसायभिमुख अभ्यासक्रम राज्यामध्ये राबविण्यात येतात.
  • शासन निर्णय क्र.व्हीओसी-2020/प्र.क्र.37/व्यशि-4 दिनांक 06 जुलै, 2020 नुसार कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी व वेगवान अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकासपरीक्षा मंडळाचे नावात “कौशल्य विकास” या नावाचा अंतर्भाव करून मंडळाचे नाव “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ” असे करण्यात आले आहे
  • मंडळाचे अभ्यासक्रम राज्यामध्ये जिल्हा-तालुकास्तरावर, ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या एकूण 1084 संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. सदरच्या अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे प्रतिवर्षी 70 ते 75 हजार विद्यार्थी प्रवेश घेत असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मंडळामार्फत घेण्यात येते आणि उत्तीर्ण उमेदवारांना शासनाच्यावतीने मंडळामार्फत प्रमाणपत्र अदा करण्यात येते.
  • मंडळाची कार्यकक्षा संपूर्ण राज्यभर असुन परीक्षा प्रक्रियेची कामे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय (06), जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय (36) तसेच जिल्हानिहाय परीक्षा केंद्र असलेल्या शासकीय तांत्रिक विद्यालये व इतर अनुषंगिक कार्यालयातील मनुष्यबळाचा उपयोग करून करण्यात येते.